ओळख आयुर्वेद आणि पंचकर्माची
आपल्या जीवनात जन्मापासून मृतुपर्यंत आपला आयुर्वेदाशी संबंध कुठे ना कुठे तरी आलेला असतोच …..
अगदी आजीबाईच्या बटव्यातील औषधे, आपल्या स्वयंपाकघरातील मसाले याचा आयुर्वेदात उल्लेख आला आहे.
मग याच आयुर्वेदाची ओळख आज करून घेवूया. आयुर्वेद हे भारतीय वैद्यक शास्त्र आहे ज्याची सुरवात ३००० वर्ष्यापुर्वी आयुर्वेदाची देवता श्री धन्वंतरी यांचेकडून झालेली आहे. याचा प्रसार चरक, सुश्रुत, वाग्भट यांच्यासह अनेक आचार्यांनी केला आहे. आपल्याकडे असणाऱ्या अनेक वेद ग्रंथामध्ये आयुर्वेदाचा उल्लेख आढळून आला आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद म्हणून देखील ओळखला जातो.
आयुर्वेदाची उत्पत्ती ही “ स्वास्थस्य स्वास्थ्य रक्षणं “ या प्रयोजानानुसार झाली आहे. आजार होवूच नये, आपले शरीन मन निरोगी राहावे असा विचार यामध्ये केला गेला आहे. त्यामधून देखील आजार झालाच तर त्यासाठी अनेक उपचार पद्धतींचा समावेश आयुर्वेदामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आहार, विहार यातील बदल, औषधी चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा योगासने याचे वर्णन करण्यात आले आहे. शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा असे चिकित्सेचे दोन भाग करण्यात आहेत
शमन चिकित्सेमध्ये अभ्यंतर औषधीद्वारे चिकित्सा करण्यात येते. आणि शोधन चिकित्सेमध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण . नस्य या पंचकर्मच्या सहाय्याने उपचार केले जातात. आयुर्वेदामध्ये शारीरिक आजारासोबतच मानसिक आजारांना देखील महत्व देण्यात आले आहे. मनाच्या आजार व शारीरिक आजार याचा संबंध वर्णन करण्यात आला आहे.
आयुर्वेदाच्या एकून ८ विशेष शाखा वर्णन केल्या आहेत. यामध्ये
कायबालग्रहोर्ध्वांग शल्य दंष्ट्राजरावृषण
अष्टा वंगानि तस्याहू चिकित्सा येशू संश्रिता
कायचिकित्सा – यामध्ये शारीरिक आजार ताप येणे, जुलाब, क्षय यासारख्या रोगांचे व त्यावरील उपचारांचे वर्णन.
बालचिकित्सा – कौमारभृत्यचिकित बालकांच्या आणि स्त्रीयांच्या मधील सर्व आजारांचे वर्णन
ग्रहचिकित्सा – देवगंधर्वदिकांच्या संचारापासून निर्माण होणार्या आजारांचे वर्णन.
उर्ध्वांगचिकित्सा – शालाक्य – छातीच्या वरील भागाची चिकित्सा कान, नाक घसा, डोळे यांचे वर्णन.
शल्यचिकित्सा – यंत्र, शस्त्र, क्षार, अग्नी याचा वापर करून शरीरातील दोष बाहेर काढणे. ऑपरेशन करणे.
दंष्ट्राचिकित्सा – अगदतंत्र – साप, विचू तसेच विषारी वनस्पतीमुळे शरीरावर झालेले विषारी परिणामांचे वर्णन
जराचिकित्सा – रसायनचिकित्सा –तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी उपचारांचे वर्णन
वाजीकरणचिकित्सा – उत्तम संतती प्राप्ती होण्यासाठीच्या उपचारांचे वर्णन
या विशेष शाखांचे वर्णन आयुर्वेदामध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार विविध आजारांमध्ये उपचार करता येतात.
आयुर्वेद हा वात पित्त कफ या तीन दोषांवर आधारित आहे. संपूर्ण आजारांचे व चिकित्सेचे वर्णन या तीन दोषांवर आधारित आहे. वात, पित्त, कफ हे तीन दोष जेव्हा समस्थितीत असतात तेव्हा शमनुष्याचे शरीर निरोगी असते, तेच उलट हे दोष विषम स्थितीत असतील तेव्हा मनुष्य आजारांनी ग्रासलेला असतो. वात, पित्त, कफ हे संपूर्ण शरीरात असतात तरिही त्यांचे एक आश्रय स्थान वर्णन केले आहे. यामध्ये वात दोष हा शरीराचा अधोभाग , पोटाच्या खालील भागात आश्रित असतो. पित्त दोष हा शरीराचा मध्य भागी म्हणजे नाभी प्रदेशमध्ये आश्रित असतो. कफ दोष हा शरीराच्या ऊर्ध्व भागामध्ये छातीच्या वरील भागामध्ये आश्रित असतो.
आयुर्वेद शोधन चिकित्सेचा महत्वाचा भाग म्हणजे पंचकर्म यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्मोक्षण आणि नस्य या पाच शोधन कर्मांचा समावेश होतो. त्यासोबत स्नेहन आणि स्वेदन याचा समावेश पूर्वकर्मा मध्ये होतो. या सर्व पंचकर्म ची थोडक्यात ओळख करून घेवूया- तसेच यातील कोणतेही पंचकर्म वैद्याच्या सल्ल्यानुसारच करून घ्यावीत.
वमन- शरीरातील विकृत असणारे दोष उलटीद्वारे शरीराच्या बाहेर काढणे. जुनाट सर्दी, दमा, त्वचेचे आजार, लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या कफ दोषामुळे होणाऱ्या आजारांवर वमन या कर्माद्वारे उपचार करता येतात. ऋतूनुसार शरीरशुद्धी करताना हे पंचकर्म वसंत ऋतूमध्ये केले जाते.
विरेचन- शरीरांतील विकृत असणारे दोष हे विरेचन / जुलाबाद्वारे शरीराच्या बाहेर काढणे. पचनाच्या तक्रारी, पोट सारखे गच्च राहणे, पोट साफ ण होणे, संडासला चिकट होणे, त्वचेचे आजार, लठ्ठपणा, कामला, मूळव्याधीच्या काही प्रकारामध्ये, स्त्रियांच्या आजारामध्ये तसेच पित्त दोषामुळे होणाऱ्या आजारांवर विरेचन या कर्माद्वारे उपचार करता येतात. ऋतूनुसार शरीरशुद्धी करताना हे पंचकर्म शरद ऋतूमध्ये केले जाते.
बस्ती – शरीरातील विकृत असणारे दोष हे अधोमार्गाने शरीरामध्ये औषध देवून ( गुदद्वार आणि मूत्राशय ) यामध्ये औषध देवून दोष शरीराच्या बाहेर काढतात. बस्ती हि वाताच्या आजारांवरील प्रमुख चिकित्सा वर्णन केलेली आहे. सर्व सांध्यांचे आजार, मणक्याचे आजार, क्षय, भगंदर, मुळव्याध, पक्षाघात यासह वात दोषामुळे होणाऱ्या अनेक आजारांमध्ये बस्ती या कर्माद्वारे उपचार केले जातात. ऋतूनुसार शरीरशुद्धी करताना हे पंचकर्म वर्षा ऋतूमध्ये केले जाते.
रक्तमोक्षण – शरीरामध्ये रक्ताच्या आश्रयाने असणारे विकृत दोष शरीराच्या बाहेर काढण्यासाठी सुईद्वारे, जळवाद्वारे, CUPPING थेरपीच्या सहाय्याने शरीराच्या बाहेर काढणे यास रक्तमोक्षण म्हणतात. त्वचेचे आजार, सर्व शरीराची आग होणे, खाज येते, हातापायाला भेगा पडणे तसेच पित्त आणि कफ दोषांमुळे होणारे आजारांमध्ये रक्तमोक्षणाद्वारे उपचार करता येतात. ऑक्टोबर हिट च्या काळात रक्तमोक्षण द्वारे शरीरातील विकृत दोष बाहेर काढल्यास होणारा त्रास टाळता येतो.
नस्य – शरीराच्या शिरोभागामध्ये असणारे दोष शरीराच्या बाहेर काढण्यासाठी नाकामध्ये तेल, तूप, चूर्ण, धूम याचा वापर केला जातो. तसेच शिरोभागातील अवयवांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नियमित नस्य करता येते. नाकामधून रक्त येणे, वारंवार डोके दुखणे, मेंदूचे आजार, नाक वारंवार कोरडे पडणे यासारख्या आजारांमध्ये नस्य या कर्माद्वारे उपचार करता येतात. गाईचे तूप, खोबरेल तेल याचा वापर नियमित नस्य साठी करता येतो.
आरोग्य टीप- नाकामधून वारंवार रक्त येणे असे होत असल्यास सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना गाईच्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुडीत नियमित टाकावेत.