त्रासदायक मुत्रकृच्छ
बदलती जीवनशैली हि अनेक मूत्रविकारांना आमंत्रण देत आहे, या मूत्रविकारांतील मुत्रकृच्छ या आजाबाबत आपण माहिती घेवूया.
मुत्रकृच्छ म्हणजे काय ?
मुत्रकृच्छ हा शब्द मूत्र आणि कृच्छ या दोन शब्दांचा एकत्रित मिळून तयार झालेला आहे. मूत्र म्हणजे लघवी आणि कृच्छ म्हणजे अवघड. त्यामुळे या रोगात लघवी कष्टाने होते, लघवी करताना जळजळ व वेदना होते किंवा लघवी थोडी-थोडी होते, वारंवार लघवीला जावे लागते, लघवी झाल्यावरही समाधान होत नाही वगैरे लक्षणे आढळतात, त्या रोगाला मूत्रकृच्छ असे म्हणतात.
मूत्रकृच्छ होण्याची कारणे –
आजाराचे निदान करण्यासाठी माधव निदान या ग्रंथाचा आधार घेतला जातो या ग्रंथामध्ये मुत्रकृच्छ या आजाराची कारणे वर्णन करताना पुढील वर्णन करण्यात आले आहे.
व्यायामतीक्ष्णौषधरुक्षमद्यप्रसंगनित्यद्रुतष्टष्ठयानात् आनुप-
मांसाध्यशनादजीर्णात्स्युर्मूत्रकृच्छ्राणि नृणां तथाऽष्टौ ॥१॥
व्यायाम, तीक्ष्ण द्रव्ये, रुक्ष पदार्थ, मद्यपान, मैथुन, वाहनांतून प्रवास करणे- हादरे बसणारी गाडी – हल्लीची दुचाकी, आनूपमांसभक्षण, अध्यशन, अजीर्ण या कारणांनीं दोष प्रकोप होऊन मूत्रकृच्छ्र हा व्याधी उत्पन्न होतो. चरकाने कषायतिक्त कटु पदार्थ आणि वेगविधारण अशी कारणे अधिक सांगितली आहेत.
मुत्रकृच्छ मधील सुरुवातीला दिसणारी लक्षणे-
शरीराच्या अधोभागी गुरुत्व/ जडपणा निर्माण होतो, मूत्रप्रवृत्तीचेंवेळीं थोडेसे अडखळल्यासारखे वाटणे, ओटीपोट, नाभी, कुक्षिभागी मूत्रप्रवृत्तीचें वेळीं किंचित् वेदना जाणवतात.
मुत्रकृच्छ आजाराचे आयुर्वेदानुसार वर्णन केलेले प्रकार आणि त्यांची लक्षणे –
ज्या कारणांमुळे मुत्रकृच्छ आजार होतो त्यानुसार मुत्रकृच्छ आजाराचे प्रकार ठरवण्यात आलेले आहेत. वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक, पुरीषज, अश्मरीज, शर्कराज व शुक्रशल्याभिधातज असे मूत्र कृच्छ्राचे आठ प्रकार आहेत.
लक्षणे
वातज मूत्रकृच्छ- मलाचा अवरोध, बस्ती कुक्षी, उदर, पार्श्व, पृष्ठ, हृदय या अवयवांमध्यें वेदना, पोट फुगणे, हृल्लास, विकर्तिका (मुत्रप्रवृत्तीचें वेळीं चरचरल्यासारखीं जळजळल्यासारखीं वेदना), अन्न न पचणें अशी लक्षणें होतात. ओटीपोट, शिस्न या भागी तींव्रस्वरुपाच्या वेदना होतात, मूत्रप्रवृत्ती वरचेवर थोडीथोडी होते.

पित्तज मूत्रकृच्छ – यामध्ये जळजळ, रक्त येणे, वेदनायुक्त अशी मूत्रप्रवृत्ती वरचेवर व कष्टानें होते, मूत्राचा वर्ण पीत असतो. मुत्र उष्णस्पर्श असते व भाजल्याप्रमाणें आग होते.
कफज मूत्रकृच्छ- यामध्ये बस्ति व शिस्न या अवयवांवर शोथ आलेला दिसतो. त्या ठिकाणीं जडपणा वाटतो.
सन्निपातज मूत्रकृच्छ- यामध्ये सर्वदोषांच्या मूत्रकृच्छ्रांतील सर्व लक्षणें असतात. मूत्र नानावर्णाचें व दाह, वेदनायुक्त असते, मूत्रप्रवृत्तीचें वेळी अंधारी येते, मुत्रप्रवृत्ती करताना अतिशय त्रास होतात.
पुरीषजमूत्रकृच्छ- मलावष्टंभामुळें शरीरामध्ये दुष्टी होऊन पोट फुगणे, ओटीपोटात वेदना व मूत्रसंग अशीं लक्षणें उत्पन्न करतो. मलाच्या मोठया आकाराच्या गाठी बनल्यामुळें त्यांच्या संचितीनें अवरोध होऊन मूत्रमार्गही पीडित होतो व या पीडनाचा परिणाम मूत्रकृच्छ्रांत होतो.
अश्मरीज आणि शर्कराज मूत्रकृच्छ्र-
या दोन्ही प्रकाराच्या मुत्रकृच्छ मधील लक्षणे समान आहेत. हृदशूल, कुक्षीशूल, कंप, मूर्च्छा, मूत्रकृच्छ, अन्नाची इच्छा नसणे अशी लक्षणे होतात. अश्मरी / शर्करेचे कण निघून गेले म्हणजे बरे वाटते व पुन्हा अश्मरी / शर्करा मूत्रवह स्त्रोसांतून घासत येऊं लागली की वेदना होण्यास सुरुवात होते. या अश्मरी/ शर्करेच्या कणांमुळे शिस्न, ओटीपोट, या ठिकाणीं वेदना होतात. मुत्राची धार विशीर्ण होते. (खंडित वेडी वाकडी, वेगहीन) शिस्न पिळवटावेसे वाटते, मूत्रप्रवृत्तीचें वेळां मलाचाही वेग येतो असे वाटते मलप्रवृत्ती होते. स्त्रोतसातून
शुक्रज मूत्रकृच्छ्र
प्रकुपित झालेले दोष, शुक्राच्या वेगाचा विघात करुन मूत्रमार्गामध्यें (किंवा मूत्रमार्गाच्या जवळच) शुक्राचा रोध करतात. हे अवरुद्ध शुक्र शिस्न, बस्ति वृषण या ठिकाणी वेदना, शोथ उत्पन्न करतें, मूत्र व शुक्र यांचें वहन नीट होत नाहीं.
अभिघातज
मूत्रवह स्त्रोसांमध्यें आलेल्या शैथिल्यानें होवो किंवा मुत्रवहस्त्रोतसाच्या पीडनानें होवो.
आहार-
आहारामध्ये लाल, जुना तांदूळ सेवन करावा. या तांदळाचे सूप धने, जिरे पूड टाकून घेतल्यास अधिक फायदा होताना दिसतो. लघवीच्या त्रासामध्ये उसाचा चांगला लाभ होतो. आहारात या रुग्णांनी कोथिंबिरीचे प्रमाण वाढवावे.
आहारात टाळावयाच्या गोष्टी –
लघवी साफ होत नसताना नसताना कोणत्याही स्वरूपाचा उपवास करू नये. साबुदाणा, शेंगदाणा यांनी लघवीच्या तक्रारी बळावतात. जांभूळ, अननस ही फळे लघवीचे प्रमाण कमी करणारे असल्याने टाळावीत. मिठाचे सेवन टाळावे. चमचमीत, तळलेल्या, अतितिखट पदार्थ आवर्जून टाळावेत. मसाल्याच्या सर्व द्रव्यांनी लघवीच्या तक्रारी वाढतात.
लघवीचा त्रास असताना रुक्ष म्हणजे कोरडय़ा गुणांची सर्व प्रकारची धान्ये खाणे टाळावे. यामध्ये नाचणी, बाजरी पूर्णपणे टाळावी. लघवीचा त्रास असताना विरुद्ध अन्नपदार्थाचे सेवन टाळावे. उदा. दूध व फळे, दूध आणि मासे अशा विरुद्ध गुणांच्या पदार्थाचे सेवन करू नये.
विहार – उन्हात अधिक काळ फिरणे, रात्रीची जागरणे, श्रम करणे यामुळेही लघवीचे त्रास वाढताना दिसतात.