आरोग्यदायी हिवाळा
भारतामध्ये संपूर्ण वर्ष हे हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीन ऋतूमध्ये विभागलेले आहे. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन यामुळे हे ऋतू निर्माण होतात. आता आपण हिवाळा या ऋतूबाबत माहिती घेवूया, सूर्य जेव्हा दक्षिण गोलार्धात असतो तेव्हा हिवाळा हा ऋतू असतो. या ऋतूमध्ये संपूर्ण वातावरण थंड असते, वातावरणात गारवा निर्माण झालेला असतो.
हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी उत्तम समजला आहे. यामध्ये उत्तम प्रकारे भूक लागते. शरीराचा पाचक अग्नी चांगला असतो. या ऋतू मध्ये आपण जो काही आहार घेतो तो चांगल्या पचनशक्तीमुळे पचवला जातो. वजन वाढविण्यासाठी हा काळ एकदम उत्तम आहे. या काळामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण हे अत्यल्प असते. बाहेर वातावरणात असणारी थंडी आणि शरीरातील उष्णता शरीरातच राहत असल्याने शरीर निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
हिवाळ्यामध्ये गोड, आंबट आणि खारट चवीच्या पदार्थांचा समावेश असावा. आहारात स्निघ पदार्थांचा समावेश आपल्या आहारात ठेवावा, दुध, दुधाचे पदार्थ, तसेच ज्वारी, बाजरी, गहू आणि विविध कडधान्याचा आहारात समावेश करावा, यामध्ये मुग हे सर्वोत्तम आहे. इतर कडधान्ये मसूर, उडीद, हरभरा हे आपल्या पचनशक्ती नुसार त्यांचा आहारात समावेश करावा. अनेक पालेभाज्या या ऋतूमध्ये शरीरास बळ देण्यास आहारात असणे आवश्यक आहे. या ऋतू मध्ये मटन, मासे, अंडी याचा समावेश करता येतो. तेलबिया मधील तिळाचा, शेंगदाणे यांचा समावेश करावा. ऋतूनुसार मिळणाऱ्या फळांचा देखील आहारामध्ये समावेश करावा.
हिवाळ्यानंतर असणाऱ्या ऋतू मध्ये शिशिर, वसंत, ग्रीष्म या ऋतुस आदानकाल असे म्हणतात या काळामध्ये सूर्य शरीराची शक्ती हिरावून घेत असतो. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
शिशिर ऋतूमध्ये थंडी जास्त वाढलेली असते आणि वातावरणात कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे त्वचेचे आजार उद्भवतात. यामध्ये त्वचा कोरडी पडणे, त्वचेला खाज येणे, तसेच ओठांना चिरा पडणे, गुदभागी चिरा पडणे, गुदाभागी आग होणे, वेदना होणे आणि संडासवाटे रक्त पडणे देखील दिसून येते. हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना चिरा पडणे, त्यातून रक्त येणे वेदना होणे हे लक्षण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त जाणवते. केसामध्ये कोंडा होणे, त्वचेचा वरील थर निघून जाणे, सोरायसिस सारखे आजार या कालावधीमध्ये डोके वर काढतात. अनेकांना शरीरावर बारीक लालसर पुरळ उठण्याचा त्रास देखील जाणवतो. वाताच्या आजारांमध्ये सांध्यांचे दुखणे आणि कंबरदुखी याचा त्रास वाढत असलेला दिसून येतो.
हिवाळ्यामध्ये आयुर्वेदाने सांगितलेला आहार देखील त्वचेस पोषक असा स्निग्ध असतो, त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा , रुक्षता कमी होण्यास मदत होते. तो आहार गरम गरम घ्यावा आणि त्यासोबत आहारात तूप देखील मुबलक प्रमाणात घ्यावे. त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यासाठी संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करणे गरजेचे आहे, तसेच आहारात तुपाचे प्रमाण देखील वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील स्निग्धता वाढून संपूर्ण शरीराचे पोषण होण्यास मदत होते. ओठांना भेगा पडल्यास त्याठिकाणी दुधाची साई आणि तूप एकत्र करून लावल्यास ओठांच्या भेगा/ चिरा लवकर भरून येतात. गुदभागी चिरा आणि खाज असताना त्या ठिकाणी घरी असणारे जुने तूप यास आयुर्वेदाच्या भाषेत पुराण घृत / जे तूप २ वर्षापेक्षा जुने आहे असे लावल्यास लगेच होणारा त्रास कमी होतो. हात आणि पायाच्या तळव्यांना चिरा असल्यास त्यास कोबरेल तेल, तूप लावावे. सांधे दुखत असताना त्या ठिकाणी तेल कोमात करून मालिश करावी, त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला कोरडेपणा कमी होवून तेथील वेदना कमी होण्यास मदत मिळते.
हिवाळ्यामध्ये संपूर्ण शरीराला मालिश केल्यामुळे शरीरास लवचिकता मिळते, त्वचेचे पोषण होते, निर्माण झालेला थकवा निघून जातो, शरीरास एक नवीन उर्जा मिळते. सर्व सांधे, मणका याचे पोषण होते. यावर असणारा ताण निघून जातो. शरीरास हलकेपणा जाणवतो.
हिवाळ्यामध्ये शरीराच्या क्षमतेनुसार सर्वाधिक व्यायाम करता येतो, व्यायामाने शरीराला बळ मिळते आणि शरीराचा स्टमिना वाढण्यास मदत होते. हिवाळा हा आरोग्यदायी असल्याने या कालावधीमध्ये घेत असणाऱ्या आहार आणि व्यायामाचा परिणाम हा पूर्ण वर्ष्याच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे स्निघ्ध पदार्थांचा समावेश आणि व्यायाम या दोन्ही गोष्ठी महत्वपूर्ण आहेत. संपूर्ण वर्षभरात त्यातील सर्वाधिक व्यायाम हा हिवाळ्यात करता येतो. पावसाळ्या मध्ये हिवाळ्यापेक्षा थोडा कमी व्यायाम करावा आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात कमी व्यायाम करावा.
शिशिर ऋतू संपून वसंत ऋतू चालू होताना दोन्ही ऋतूच्या शेवटच्या आणि सुरवातीच्या एका आठवड्यास ऋतूसंधिकाल असे म्हणतात. यामध्ये ऋतूबदलामुळे होणारे आजार उत्पन्न होतात. ते टाळण्यासाठी आहार आणि विहारमध्ये लगेच बदल न करता नवीन ऋतूच्या सुरवातीस काही दिवस आधीच्या ऋतूमधील आहार आणि विहार तसाच चालू ठेवावा व काही काळानंतर तो बदलावा.
आयुर्वेदामध्ये स्नेहन आणि स्वेदन वर्णन केले आहे त्याचा हिवाळ्यामध्ये चांगला फायदा होत असलेला दिसून येतो. थंडी संपून नंतर येणाऱ्या वसंत ऋतू मध्ये वमन हे पंचकर्म करून शरीरात साचून राहिलेला कफ दोष बाहेर काढता येतो. या दोषामुळे दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास होत असतो. त्यामुळे वसंत ऋतू मध्ये वमनाद्वारे ऋतूनुसार शरीर शुद्धी करून घेतल्यास पुढील काळात कफामुळे होणारे त्रास होत नाहीत.
आरोग्यटीप
अंगावर लालसर पुरळ उठून त्याची खाज होत असल्यास एक चमचा लिंबू रस, एक चमचा मध आणि कोमट पाणी याचा वापर केल्यास खाज कमी होण्यास मदत होते.