गर्भसंस्कार गर्भाचे आणि गरोदर महिलेवरचे
संपूर्ण जीवनकाळासाठी १६ संस्काराचे वर्णन केले आहे. त्यामध्ये गर्भाशी निगडीत करावयाचे सर्व संस्कार जे गरोदर महिलेवर केले जातात ते सर्व गर्भसंस्कार मध्ये येतात. मनुष्याच्या जन्मानंतर मृत्यूपर्यंत त्याच्यावर अनेक संस्कार केले जातात त्यामध्ये गर्भसंस्कार हा जन्माच्या आधीपासून केला जाणारा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. आपल्या पुरातन वेदांमध्ये, अनेक ग्रंथांमध्ये गर्भसंस्काराचा उल्लेख आलेला आहे. सर्वार्थाने मातृत्वाचा सुखद अनुभव मिळण्यासाठी गर्भसंस्कार फायदेशीर आहेत.

गर्भसंस्कार या शब्दांची फोड केली असता गर्भ म्हणजे पोटामध्ये असणारे बाळ किंवा होणारे बाळ. गर्भधारणा होण्यापूर्वी गर्भाच्या बाबतीत आपण इच्छित असणाऱ्या गोष्टी बाळामध्ये याव्यात यासाठी म्हणून होणारे बाळ याचा देखील समावेश केला आहे. संस्कार म्हणजे विशिष्ट पद्धतीने शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी, यामध्ये गर्भधारणा होण्यापूर्वी बाळाच्या आई वडिलांनी शिकवायच्या किंवा करावयाच्या गोष्टी, तसेच गर्भधारणा झाल्यानंतर बाळाचा जन्म होईपर्यंत बाळ गर्भात असताना केले जाणारे संस्कार, जे आईद्वारे बाळापर्यंत पोचवले जातात. ज्या बाळाच्या व बाळाच्या आईच्या पुढील भविष्यातील वैशिष्ट्यपूर्ण जीवनासाठी केल्या जातात. तसेच गरोदरपणाच्या काळामध्ये गरोदर महिलेचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले टिकून राहावे, प्रसूतीसाठी सक्षमपणे सामोरे जाता यावे, तसेच प्रसूती नंतर येणाऱ्या काळामध्ये शरीराची झालेली झीज भरून येणे याची तयारी यामधूनच होत असते.
गर्भसंस्काराची अनेक उदाहरणे आहेत त्यातील आपल्या सर्वाना माहिती असलेले एक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ आईसाहेब. स्वराज्याच्या संकल्पनेचे बीज शिवाजी महाराजांवर गर्भावस्थेमध्येच पेरले गेले होते, त्यामुळे पुढील काळात स्वराज्याची उभारणी झाली.
बाळ गर्भामध्ये असताना सर्वात जास्त गोष्टी शिकत असते. सर्वात जास्त गोष्टी शिकण्याची अवस्था म्हणजे बाळ गर्भात असतानाची आहे. या करिता गर्भ संभावापासूनच जर योग्य आचार , विचार गर्भाच्या मनावर रुजवले तर त्याचा प्रभाव पुढील आयुष्यावर अधिक प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे गर्भसंस्कार हि काळाची गरज नाही तर बाळाची गरज आहे.
गर्भसंस्कार का करावे – सुप्रजा म्हणजे निरोगी, सुदृढ, सुंदर, अव्यंग, सुबुद्ध, सुस्वभावी, कर्तुत्ववान अपत्य होण्यासाठी. आपल्याकडे म्हटले जाते – “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” ज्या पद्धतीने आपण जे बीज शेतामध्ये पेरतो त्या नुसार आपल्याला आलेले पिक आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न असते. तेच आपल्या आयुष्यात आहे. बाळाची उत्पत्ती होण्यासाठी गर्भधारणा होणे गरजेचे असते आणि गर्भधारणा होण्यासाठी स्त्री च्या शरीरामध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग होणे गरजेचे असते. यावेळी संयोग होणारे बीज सुधृढ नसेल तर पुढे गर्भाची वाढ आणि जन्मानंतर बाळाची योग्य वाढ होत नाही असे दिसून आले आहे. या करिता गर्भ संभावापासूनच जर योग्य आचार , विचार गर्भाच्या मनावर रुजवले तर त्याचा प्रभाव पुढील आयुष्यावर अधिक प्रमाणात दिसून येतो. Because Intrauterine stage is the most educable stage of life .
गर्भसंस्कार मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो.
बीजसंस्कार / बीजशुद्धी
लेखाच्या सुरवातील सांगितल्या नुसार “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” गर्भाची उत्पत्ती ही स्त्री बीज आणि पुरुष बीज यांच्या एकत्रीकरणामुळे होते. गर्भधारणेपूर्वी स्त्री बीज आणि पुरुष बीज यांची पंचकर्माने शुद्धी करणे यास बीजसंस्कार असे म्हणतात. बीज उत्तम असेल तर त्यापासून तयार होणारे फळ हे देखील उत्तमच मिळते. बीजसंस्कार करताना ते गर्भाची वाढ स्त्रीच्या शरीरात होणार आहे म्हणून फक्त स्त्री ची बीज शुद्धी न करता गर्भ उत्पन्न होण्यासाठी पुरुष बीज आणि स्त्री बीज दोघांची गरज असते त्यामुळे स्त्री बीज आणि पुरुष बीज दोघांची पंचकर्म करून शरीरशुद्धी करावी. पंचकर्म करून शरीरशुद्धी करताना त्याद्वारे बीजशुद्धी करता येते. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य ही पंचकर्म करता येतात.
योगासने आणि ध्यानधारणा – गर्भावस्थ्येमध्ये/ गरोदर असताना योग व ध्यानधारणा केल्याने गर्भिनीचे मन शांत व एकाग्र होते. त्यामुळे सुलभ प्रसूती / नॉर्मल डिलिव्हरी साठी मदत मिळते, तसेच संपूर्ण गरोदरपणाच्या काळात आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यासठी मदत मिळते. नियमित ध्यानधारणा / मेडीटेशन केल्याने आईच्या डोक्यात सकारात्मक विचार येतात आणि बाळ अध्यात्मिक भावनात्मक व शारीरिक दृष्टीने मजबूत बनते.
टीप – गर्भसंस्कार सुरु करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेवूनच सुरुवात करावी.
व्यायाम आणि योगासने

व्यायामामध्ये येणाऱ्या गोष्टी मध्ये चालणे, योगासने याचा नियमित सराव करणे फायदेशीर आहे. आताच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळामध्ये प्रत्येकजण नियमित व्यायाम करतोच असे नाही परंतु गर्भिणी कालावधी मध्ये नियमित व्यायाम करणे गरोदर महिला आणि बाळासाठी खूपच फायदेशीर आहे. तसेच नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी देखील याची मदत होते. पूर्वीच्या काळामध्ये महिलांना करावी लागणारी कामे यामुळे त्यांचे शरीर आपोआपच लवचिक राहत होते. आता यासाठी व्यायाम करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्यायाम आणि योगासने केल्याने गरोदर महिलेचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले टिकून राहण्यास मदत मिळते. कोणतेही व्यायाम सुरु करण्यापूर्वी आपण ज्या डॉक्टरांचे उपचार घेत आहात त्यांचा सल्ला घेवूनच ते सुरु करावेत.
नियमित चालणे – सर्वांसाठीचा सर्वात सोपा व्यायाम, गरोदरपणाच्या ९ महिन्याच्या कालावधीमध्ये अगदी सुरवातीच्या पहिल्या दिवसापासून प्रसूती पर्यंत करता येतो. चालताना मांड्यांचे स्नायू, निताम्बाचे स्नायू वापरले जातात त्यामुळे कटी प्रदेशमध्ये लवचिकता निर्माण होवून पुढे नैसर्गिक प्रसूती साठी मदत मिळते. चालताना मध्यम गतीने चालणे फायदेशीर ठरते, धावत पळत चालणे किंवा अगदी संथ गतीने चालण्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होवू शकतो. चालताना सकाळी आणि सायंकाळच्या वेळी चालणे फायदेशीर असते. गरोदरपणाच्या सुरवातीच्या ३ महिन्यात चालायला सुरुवात केली असेल तर तेथून पुढे चालण्याचा व्यायाम वाढवत न्यावा. १५ मिनिटापासून पुढे एक तासापर्यंत आपल्या क्षमतेनुसार वेळ वाढवत न्यावा. शेवटच्या तीन महिन्यात पायावर सूज येण्यास सुरुवात होते, तरीदेखील चालण्याचा व्यायाम बंद करू नये. शेवटच्या ३ महिन्यात नियमित चालण्याने बाळाचे डोके खालील बाजून येणून प्रसूतीसाठीची नैसर्गिक स्थिती निर्माण होण्यास मदत मिळते.
योगासने – गरोदरपणाच्या कालावधीमध्ये योगासने करताना खूप काळजीपूर्वक आसने करणे आवश्यक आहे. आसनांमध्ये पद्मासन, वज्रासन, बद्धकोनासन आणि शवासन ही सहज करता येणारी आणि गर्भिणी कालावधी मध्ये फायदेशीर अशी आसने करता येतात.
पद्मासन किंवा सुखासन – गरोदर महिलानां ज्या स्थितीमध्ये सुखकारक कोणताही त्रास न होता बसता येते ते सुखासन, शक्य असल्यास पद्मासनात देखील बसावे. यामुळे खुब्याचे सांध्ये लवचिक होण्यास मदत मिळते. खुब्याचे आकुंचन आणि प्रसारण क्रिया सुलभ होते.
वज्रासन – संपूर्ण गर्भिणी अवस्था सहजरीत्या करता येणारे आसन, जेवण केल्यानंतर आसन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. या आसनाने पाय मांड्या आणि कमरेचे स्नायूंचा व्यायाम घडून येतो.
शवासन – गरोदरपणाच्या कालावधीमध्ये शारीरिक आणि मानसिक बदलाचा शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो, शारीरिक आणि मानसिक ताणताणाव कमी करण्यासाठी शवासन हि क्रिया खूपच लाभदायक आहे.
बद्धकोनासन – या आसनाचा नियमित सर्व केल्याने मांड्यांचे स्नायू आणि खुब्याच्या सांध्यांमध्ये लवचिकता निर्माण करण्यास फायदेशीर आहे, प्रसूतीची पूर्वतयारी या आसनाचा सर्व केल्याने होते.
प्राणायाम – नियमित प्राणायाम क्रिया आई आणि बाळाला प्राणवायूचा सुरळीत पुरवठा करण्यास मदत करते. प्राणायाम आणि दिर्घश्वसन यामुळे प्रसूती काळात येणारा थकवा टाळण्यास मदत मिळते. प्राणायाम सकाळी सूर्योदयाच्या वेळी करावे. प्राणायामासोबत ओंकारचा सराव करणे देखील लाभदायक आहे.
निद्रा – गरोदर महिलांनी नियमित आवश्यक आहे तेवढी झोप घेणे गरजेचे आहे. झोपेत असताना एका कुशीवर झोपावे. पुरेशी झोप शरीराची उर्जा वाचवून, साठवून ठेवण्याचे काम करते. आणि ताणताणाव नाहीसा होण्यास मदत मिळते.
अभ्यंग – व्यायामासोबतच गरोदरपणाच्या कालावधी मध्ये अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावणे लाभदायक आहे. दररोज अंघोळीच्या आधी कंबर, मांड्या, पाय यांना तेल लावावे. यामुळे स्नायूंच्यामध्ये लवचिकता निर्माण होण्यास मदत मिळते.
तुपाचे सेवन – गरोदरपणाच्या काळात आहारात तूप घेणे खूपच फायदेशीर आहे. आयुर्वेदामधील अनेक ग्रंथांमध्ये गर्भिणी अवस्थेमध्ये तुपाचे सेवन करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे आईच्या आणि बाळाच्या बाळाच्या शारीरिक व मानसिक स्थिती निरोगी ठेवणे आणि विकासासाठी लाभदायक असते कारण यामुळे बाळाला जन्मजात आजारांपासूनही मुक्ती मिळण्यास मदत मिळते.