fbpx
Select Page

ग्रामीण आरोग्य आणि आयुर्वेद

       सध्याच्या धकाधकीच्या काळात आपले आरोग्य टिकवून ठेवणे मोठे जिकीरीचे होऊन बसले आहे. भारतातील ग्रामीण भागातील आरोग्याविषयी बोलायचे झाले तर भारतामध्ये फारपूर्वीपासून अस्थित्वात असलेला आयुर्वेद. हा आयुर्वेद भारतातल्या ग्रामीण भागाशी एकरूपपणे जोडला गेला आहे.

       ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे मूळ हे पूर्वीच्या काळापासून घेतला जाणारा सकस आहार आहे. पूर्वीच्याकाळी माणसे ही वयाची शंभरी गाठलेली पाहायला मिळायची. पण आताच्या काळामध्ये वयाच्या विशीतील तरुण मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक आजारांनी ग्रासलेले पाहायला मिळतात.

       आयुर्वेद हे शास्त्र ३००० वर्षे जुने शास्त्र आहे. यामध्ये संपूर्ण शरीररचना, शरीरातील सर्व अवयवाची माहिती तसेच त्यांचे होणारे आजार व त्यावरील उपचार याची माहिती दिलेली आहे. आपण ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या आरोग्य विषयी सामासेबाबत बोलताना ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती, व्यवसाय याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.

       ग्रामीण भागातील लोक हे जास्त शारीरिक कष्ट करत असलेले आढळून येतात. यामध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघेही शेतामध्ये शारीरिक कष्ट करत असल्याने त्यांच्यामध्ये कंबर दुखणे, गुडघे, यासारखे वाताचे आजार जास्त प्रमाणात झालेले आढळून येतात.

       तसेच आजार / होणारा त्रास अंगावर काढणे – सहन करत बसणे, थोडासाच त्रास होतोय – उद्या कमी होईल असा विचार बरेचसे जण विशेषता महिला करत असलेले  आढळून येते. त्यामुळे त्रास कमी असताना आजार लवकर बाबर होऊ शकतो, तो त्रास सहन केल्याने पुढे जाऊन आजारामुळे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे आजार कोणताही असो त्याच्यावर लवकर उपचार घेतल्यास आता होत असलेल्या त्रासामधून मुक्ती मिळतेच त्यासोबत पुढे जावून होणारा शारीरिक मानसिक त्रास वाचतो.

                            “ स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम “

       आता आयुर्वेदाबाबत बोलायचे झाले तर आयुर्वेदाची उत्पत्ती हि निरोगी व्यक्तींची आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी झाली आहे. लोकांनी आयुर्वेदानुसार दिनचर्या, ऋतुचर्या याचे पालन केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम राहतेच त्यासोबत मानसिक स्वाथ्य ही चांगले टिकून राहते.

       आयुर्वेदामध्ये सर्व आजारांसाठी जी पथ्य सांगितली आहेत याचे पालन केल्यास आजारांपासून दूर राहता येते. येथे उदाहरण घ्यायचे झाले तर –

       जेवण गरम-गरम घेतले पाहिजे, आपल्या आहारात नेहमी तुपाचा वापर केला पाहिजे, चांगली भूक लागल्यानंतर जेवण करावे, आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. आपल्या भागामध्ये जी फळे उत्पादित केली जातात त्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे.

       शिळे अन्न खाणे टाळावे, जास्त तिखट तेलकट अन्नपदार्थ टाळणे, वारंवार फास्टफूड खाणे, अति प्रमाणात पाणी पिणे, अति जागरण या सर्व गोष्ठी टाळल्या पाहिजेत. आहाराबाबत काय खावे – काय खावू नये याचा उल्लेख केल्यानंतर आता विहाराबाबत बोलूया.

       सकाळी लवकर उठले पाहिजे. मल – मूत्र यांचे विसर्जन करण्याची इच्छया झाल्यानंतर विसर्जन केले पाहिजे. मल – मुत्राचे योग्य वेळी विसर्जन न करणे हे देखील अनेक आजारांचे कारण आहे. नेहमी व्यायाम केला पाहिजे. दिवसा झोपणे टाळावे. हे सर्व निरोग राहण्यासाठी केले पाहिजे.

       आजार झाला तर तो लवकर बरा व्हावा म्हणून जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. औषधे आणि पंचकर्म यांचा वापर करून आजारापासून मुक्ती मिळवता येते. आपले स्वयंपाकघर हा देखील एक एक प्रकारचा दवाखानाच असतो. स्वयंपाकामधे वापरले जाणारे अनेक प्रकारचे मसाले हे अनेक आजारांच्या उपचारामध्ये फायदेशीर असतात. उदा. आले/सुंठ, हळद यांचा अनेक आजारांमध्ये उत्तम पाचक औषध म्हणून उपयोग केला जातोच त्यासोबत शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे, भूक लागण्यासाठी देखील उपयोग होतो. त्यामुळे सुंठ, हळद यांचा आहारामध्ये नेहमी समावेश असावा.

        ग्रामील भागातील आरोग्यसेवेबाबत बोलायचे झाले तर अजून चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सुविधा ग्रामीण भागामध्ये पोचणे गरजेचे आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा दैनंदिन जीवनामध्ये समावेश करून आजार होवूच नये म्हणून आयुर्वेद अंगीकारावा.

        आयुर्वेदाचे उपचार घेताना कोणती काळजी घ्यावी –

       आजार झाल्यानंतर आजारी व्यक्ती हे वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार घेतात. बऱ्याच वेळा आयुर्वेदाकडे येताना शेवटचा उपाय म्हणून आम्ही आयुर्वेदाकडे आलो असे म्हणताना दिसून येतात. अश्या वेळी आयुर्वेदिक औषधे ही  आयुर्वेद पदवीधर वैद्यांकडून घ्यावीत. अनेक भोंदूबाबा हे लोकांना लुटण्यासाठी बसलेले दिसून येतात.

       आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य औषधांचा योग्य ठिकाणी वापर करणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा अश्या भोंदूबाबांकडून चुकीची औषधे दिली गेल्याने शरीराचे अंतर्गत अवयव निकामी झाल्याही अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.

       आपल्या निरोगी आयुष्यासाठी सर्वाना शुभेच्छ्या. आपण आयुर्वेद आपल्या नियमित आयुष्यामध्ये अंगीकारून आजारांना आपयापासून दूर ठेवूया.

                  वैद्य श्रीधर पवार

× How can I help you?